सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह रंगभूमीवरही शोककळा पसरली असताना, त्यांच्या सोलापुरातील आठवणींना उजाळा मिळत आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी हुतात्मा स्मृती मंदिरात रंगलेल्या ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग आणि त्यावेळी घडलेला एक प्रसंग आजही सोलापुरातील नाट्यकर्मींच्या स्मरणात आहे. नाटकातील महिलेवरील अत्याचाराचा प्रसंग सुरू असताना काही प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवल्याने नाना पाटेकर संतापले आणि त्यांनी चक्क प्रयोग थांबवत प्रेक्षकांना त्या प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगितले होते.
नाना पाटेकर आणि अभिनेत्री रीमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘पुरुष’ हे नाटक त्यावेळी सोलापुरात सादर करण्यात आले होते. नाटकात नाना पाटेकर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कथानकातील एका प्रसंगात महिलेवर अत्याचार होत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा प्रसंग सुरू असतानाच सभागृहातील काही प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज येऊ लागला. कलाकार म्हणून भूमिका साकारत असलेल्या नाना पाटेकर यांना मात्र ही प्रतिक्रिया अस्वस्थ करणारी वाटली.
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रयोग थांबवला आणि प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली. एका महिलेवर अत्याचार होत असताना त्याला टाळ्या-शिट्ट्यांनी दाद देणे योग्य नाही, अशा आशयातून त्यांनी प्रेक्षकांना सुनावल्याची आठवण ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत बडवे यांनी सांगितली. त्या क्षणी रंगमंचावरील कलाकारापेक्षा सामाजिक संवेदनशीलता जपणारा नाना पाटेकर प्रेक्षकांसमोर उभा राहिला, अशी आठवणही या प्रसंगाला उजाळा देताना सांगितली.
या घटनेनंतर ‘अशा प्रकारचा रसिक असेल तर मी नाटक करणार नाही,’ अशी भूमिका नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्याचे प्रशांत बडवे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, त्यानंतर नाना पाटेकर पुन्हा सोलापुरात नाटकाच्या प्रयोगासाठी आले नसल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
नाना पाटेकर यांचा सोलापुरातील हा नाट्यप्रयोग आता इतिहासाचा भाग झाला आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनयाची, परखड स्वभावाची आणि सामाजिक संवेदनशीलतेची चर्चा पुन्हा सुरू झाली. सोलापुरातील हा किस्साही आठवणींमध्ये पुढे आला आहे. पडद्यावर असो वा रंगभूमीवर, भूमिका केवळ सादर न करता तिच्यामागचा सामाजिक आशयही प्रेक्षकांनी समजून घ्यावा, अशी त्यांची भूमिका या प्रसंगातून दिसून आली.
—-