शिक्षण देऊया, भविष्य घडवूया” आणि “अन्नदान हेच श्रेष्ठदान” या सामाजिक बांधिलकीच्या उदात्त विचाराने प्रेरित होऊन आस्था सामाजिक संस्था, सोलापूर यांच्या वतीने आयोजित ‘वंचित, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप’ हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शहरातील शिंदे चौक येथील शिवस्मारक सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूरचे शिक्षणाधिकारी कादर शेख, सोलापूर महानगर पालिकेचे सभागृह नेते .नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तानाजी माने नागेश खरात शहराध्यक्ष ( पुर्व , पश्चिम मंडळ सोलापूर) ( आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) देविदास चेळेकर, ( संचालक आस्था सामाजिक संस्था ) योगेश कुंदुर ( संचालक आस्था सामाजिक संस्था) वसुधंरा पवार, संपदा जोशी, रेणुका जाधव ( क्रांती महिला संघटनेच्या समन्विका) यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रथम सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 100 गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या मध्ये स्कूल बॅग, कंपास, वह्या, पॅड, पेन, इत्यादी.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. कादर शेख यांनी आस्था सामाजिक संस्थेने वंचित विद्यार्थ्यांसाठी दिलेली ही प्रेमाची भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पाठीवर हात ठेवून ‘फक्त लढ’ असा धीर आणि बळ देणारा विश्वास आज संस्थेने या विद्यार्थ्यांना दिला आहे. मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये. मुलांनो, आपल्या चिकाटीने व कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवा; कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडू नका. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरच विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता येईल. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांनुसार नेहमी मोठी स्वप्ने बघण्याची ताकद ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा,” असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
प्राचार्य तानाजी माने यांनाही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे पंख पूर्ण करण्यासाठी हे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. ‘मनामध्ये जिद्द असेल तर निश्चितच यश मिळते’, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.”तर मा.नरेंद्र काळे यांनीही सोलापूर शहरात उपाशी कोणी राहू नये, या भावनेने सातत्याने काम करणारी आस्था ही एक तत्पर संस्था आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही उत्तम शिक्षण घेऊन सुजाण व सक्षम नागरिक व्हा आणि उद्याच्या काळात इतर गरजू समाजाला मदत करा. अभ्यासात सतत मेहनत करून आपल्या आई-वडिलांचे व शहराचे नाव मोठे करा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रतिभा कंगळे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी, सुरज छंचुरे, प्रशांत छंचुरे वेदांत तमशेट्टी, अथर्व कोळुरे, अथर्व शिंदे, यांनी परिश्रम घेतले.