श्रीप्र – आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती (महाळुंग) व मुंडफणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बालदिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. विद्यार्थ्यांच्या मुखातून घुमणाऱ्या “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड नामघोषाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दिंडीत दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून आकर्षक सहभाग नोंदविला. टाळ, मृदुंग, वीणा, भगव्या पताका आणि अभंगांच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीने उपस्थित ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. मार्गात ग्रामस्थांनी बालवारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
वारकरी संप्रदायाची महान परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये भक्ती, समता, बंधुभाव, सेवा आणि संस्कारांची जोपासना व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग, हरिपाठ आणि भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर, मोहिनी कलढोणे व इम्रान मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक नितीन गुंड यांनी सर्व बाल वारकऱ्यांना केळी वाटप केली.तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. या संयुक्त उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये रुजविणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 5