सोलापूर : मराठी प्रेक्षकांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात हास्याचा धमाका घेऊन येणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला असून, १५ मेपासून हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांत झळकणार आहे. यंग ब्रिगेडनं तयार केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार, असा विश्वास दिग्दर्शक निलेशसिंह राजपूत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
चित्रपटाची कथा दोन सर्वसामान्य तरुणांच्या भोवती फिरते, ज्यांना हिरो बनण्याचं स्वप्न असतं. फिल्म इंडस्ट्रीबद्दल फारशी माहिती नसतानाही ते या क्षेत्रात उडी घेतात आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला येणारे अनुभव, संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहेत. टीझरमधून या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
त्रिमूर्ती फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार यांनी केली असून, शिवाजी पाटील सहनिर्माते आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा निलेशसिंह राजपूत यांनीच सांभाळली आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे आणि संध्या-प्रनिकेत यांच्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीत दिलं आहे.
चित्रपटातील गाण्यांना आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते आणि एल. के. लक्ष्मीकांत यांचा आवाज लाभला आहे. छायांकनाची जबाबदारी विनोद पाटील यांनी सांभाळली असून संकलन रोहन पाटील यांनी केलं आहे.
प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते आणि अंकिता राऊत अशी नव्या-जुन्या कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मजेशीर कथानक, टायमिंगला साजेसं लेखन, ताल धरायला लावणारं संगीत आणि दमदार अभिनय या जोरावर पिक्चर बॉईज हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह पाहण्याजोगा ठरणार आहे. हलक्याफुलक्या मनोरंजनासोबतच संघर्षातून स्वप्न पूर्ण करण्याचा संदेश देणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या पत्रकार परिषदेस साक्षी पंडितपवार, प्रतीक लाड, अरबाज शेख, पवन चुरे, रवि पंडितपवार, विठ्ठल बडगंची आदी उपस्थित होते.
—

























