सोलापूर – दक्षिण सोलापूरमधील भाजपा अंतर्गत गटबाजी वाढत चालली असून मंद्रूपमध्येही पक्षांतर्गत कुरघोडी सुरू असल्याने भाजपाकडून नव्या नेतृत्वाची निवड निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेंडगुदले — मुगळे वादात आता मोतीलाल राठोड यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी मंद्रूप ग्रामपंचायत निवडणूकीची ‘कमांड’ मोतीलाल राठोड यांच्याकडे असणार आहे. सत्ताधारी कोरे व विरोधी मुगळे यांना पर्यायी नेतृत्व म्हणून राठोड यांना पसंती दिल्याची चर्चा आहे.
मोतीलाल राठोड यांनी आरके फाउंडेशनच्या माध्यमातून मंद्रूपमध्ये अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविला आहे. शिवाय सेवालाल नगरला ‘नवा लूक’ देण्यातही राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे. ठेकेदारीच्या माध्यमातून राठोड समाजोपयोगी कामे करून मंद्रूपला ‘माॅडेल’ बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वी त्यांच्या भावजया वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये सदस्य म्हणून काम करताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तसेच सरपंच निवडणूकीतही कमी मताने त्यांचा पराभव झाला आहे. मंद्रूपमध्ये त्यांच्या गटाचे तीन ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणूकीसाठी ते इच्छुक होते. मात्र भाजपाच्या नेतृत्वाकडून ‘सबुरी’चा सल्ला देण्यात आल्याने त्यांनी आमदार देशमुख यांचे आदेश मानून काम केला आहे. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश मानणारा पक्ष कार्यकर्ता म्हणून राठोड यांचे नाव आघाडीवर आहे.
मंद्रूपमध्ये २०१७ ते २०२२ या कार्यकाळात आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही मेंडगुदले—मुगळे वादामुळे सरपंच निवडणूकीत भाजपाला फटका बसला. भाजपाचे युवा मोर्चाचे संघटन सरचिटणिस गौरीशंकर मेंडगुदले व पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्यातील ‘ तू तू मैं मैं ‘ संपविण्यासाठी मोतीलाल राठोड यांच्याकडे नेतृत्व सोपविणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. राठोड यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन आमदार सुभाष देशमुख व बाजार समिती संचालक मनिष देशमुख यांनी मंद्रूपची भाजपाची धुरा राठोड यांच्याकडे सोपविणार आहेत.
….
मुगळे यांना झटका
…
बाजार समिती संचालक मनिष देशमुख व पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्यातील कटुता दिवसेंदिवस वाढत आहे. आ. देशमुख यांचा विरोध असतानाही मुगळे उमेदवारी मिळवून निवडून आले. विजयानंतर मुगळे यांनी आमदार देशमुख यांना खुले आव्हान देत कार्यकर्त्यांना डिवचले होते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा करून मनिष देशमुख यांनी मंद्रूप ग्रामपंचायत निवडणूकीची जबाबदारी मोतीलाल राठोड यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राठोड यांचे नेतृत्व मुगळे यांच्यासाठी धोका मानला जात आहे.
…
नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणार
….
आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत कोरे व मुगळे यांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत आमदार देशमुख व मनिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा कमळ फुलविणार आहे. वरिष्ठांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत वाद मिटविण्यास प्राधान्य देणार आहे. सर्व कार्यकर्ते व मंद्रूप विकासप्रेमी नागरीकांना घेऊन ग्रामपंचायतीची व्यूहरचना आखणार आहे. मंद्रूपला विकासाचा ‘माॅडेल’ बनविण्याचा आ. देशमुख यांचे स्वप्न साकार करणार आहे.
मोतीलाल राठोड, संस्थापक अध्यक्ष, आरके फाउंडेशन मंद्रूप
…
















