सोलापूर : मुरारजीपेठ परिसरातील महापारेषणच्या १३२ केव्ही नविवेस उपकेंद्रातून बाहेर पडलेल्या हायपॉवर विद्युत टॉवरवर अंदाजे ६५ ते ७० वर्षांचा वृद्ध गुरुवारी सकाळी चढल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या थरारक बचावकार्यात पोलिस, अग्निशमन दल आणि नागरिकांची अक्षरशः दमछाक झाली. अखेर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला पकडले आणि सुखरूप खाली आणले.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती विद्युत टॉवरवर चढल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. तरुणांनी तातडीने शेजारील महापारेषण उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. व्यक्ती टॉवरवर असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित विद्युत वाहिनीचा पुरवठा तातडीने बंद करण्यात आला.महापारेषणचे कनिष्ठ तंत्रज्ञ मोहन काळे यांनी पोलिस व अग्निशमन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टॉवरवरील वृद्धाला खाली येण्याची विनंती सुरू केली. काही वेळात अग्निशमन दलाचे पथकही दाखल झाले. मात्र, वृद्ध कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो कधी टॉवरच्या एका बाजूला, कधी दुसऱ्या बाजूला, तर कधी वर-खाली अशी धोकादायक हालचाल करत असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण झाले.
दरम्यान जुनी पोलीस लाईन ते शेटे वस्ती या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर नागरिकांची गर्दी, बघ्यांची वाहने आणि बचावकार्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. एकीकडे वृद्धाला सुखरूप खाली उतरविण्याचे आव्हान, तर दुसरीकडे गर्दी व वाहतूक नियंत्रण अशी दुहेरी कसरत पोलिसांना करावी लागली.
अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी खाली जाळी पकडून ठेवली. वृद्धाने उडी मारली किंवा तोल गेल्यास त्याला जाळीत पकडता यावे, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. टॉवरवर तीन तासांहून अधिक काळ राहिल्याने वृद्धाला तहान लागली. त्याने वरून हातवारे करून पाण्याची मागणी केली. पोलिसांनी हीच संधी साधत त्याला पाण्याची बाटली आणि पैसे दाखवत खाली येण्यास प्रवृत्त केले.
पाणी घेण्यासाठी वृद्ध टॉवरच्या टोकावरून शिडीच्या दिशेने खाली येऊ लागला. याच क्षणी काही धाडसी तरुण एका बाजूने टॉवरवर चढले. वृद्धाने त्यांना झटकण्याचा व ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एका तरुणाने त्याला घट्ट पकडले. त्यानंतर इतर तरुणांनीही त्याला घेरून पकडले. दोरीच्या साहाय्याने त्याला सुरक्षित करण्यात आले आणि अग्निशमन दलाने तयार ठेवलेल्या जाळीजवळ त्याला अलगद खाली आणण्यात आले. खाली आल्यानंतर वृद्धाने पाणी मागितले. पोलिसांनी त्याला पाणी दिले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले.
बचावकार्यात अग्निशमन विभागाचे संजय जगताप, रावसाहेब सलगर, गौतम आव्हाड, आशुतोष दुधाळ, नेताजी दराडे, चालक शकील होटगीकर, किशोर कदम, पुष्कराज घुमे आणि श्रीकांत भडके यांनीही जाळी पकडून व अन्य आवश्यक मदत करून सहकार्य केले.
चौकट
वृद्धाची ओळख अद्याप अस्पष्ट
या वृद्धाचे नाव, तो नेमका कुठून आला आणि टॉवरवर चढण्यामागील कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला स्थानिक भाषा समजत नसल्याचे घटनास्थळी दिसून आले. त्याच्या पेहरावावरून तो महाराष्ट्राबाहेरील असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.



















