अक्कलकोट – लहान मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून ६३ वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हंजगी (ता. अक्कलकोट) येथे घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या निलप्पा बसवण्णप्पा मजगे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पाटील यांच्या शेतवस्ती परिसरात ही घटना घडली. आरोपी सिद्धाराम लक्ष्मण देसाई, श्रीशैल सिद्धाराम पाटील, सुरेश श्रीमंतराव पाटील आणि प्रकाश श्रीमंतराव पाटील (सर्व रा. कोन्हाळी, ता. अक्कलकोट) यांनी निलप्पा मजगे हे सिद्धाराम देसाई यांच्या लहान मुलीला पळवून घेऊन जात असल्याचा संशय घेतला.
याच संशयातून ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निलप्पा मजगे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला.
मृत निलप्पा मजगे यांचा मुलगा सुरेश मजगे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे करीत आहेत.