सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती आणि सीसीटीव्ही प्रणालीबाबतचे निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यापीठ विकास कृती समितीने कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे केली आहे. विद्यापीठ विकास कृती समितीने या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे.
कृती समितीच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते पाटील व सचिव प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोरोनानंतर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. या बदललेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर नोकरी-रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. शिवाय, शासनाचा असा कोणताही आदेश नसल्याने बायोमेट्रिक हजेरी सिस्टिम लागू न करण्याची विनंती करण्यात आली आहे.
——-
मानवी हक्क भंगाची शक्यता?
समितीने महाविद्यालयातील सीसीटीव्ही सिस्टीमच्या संदर्भातही चिंता व्यक्त केली आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या सीसीटीव्हीचे डायनॅमिक / स्टॅटिक आयपी एड्रेस मागितल्याने मानवी हक्क भंगाच्या शक्यता निर्माण होऊ शकतात, असे समितीचे म्हणणे आहे. यामुळे अशाप्रकारची माहिती न मागवण्याची विनंती करण्यात आली आहे.
——–
विद्यापीठाने वेळेत समित्या द्याव्यात
प्राध्यापक भरती प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने दप्तर दिरंगाई न करता वेळेत समित्या द्याव्यात. तसेच सीएचबीच्या मान्यता आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १ ऑकटोबर २०१७ चा कार्यभार ग्राह्य धरण्याची विनंती करण्यात आली आहे.
—————




















