बार्शी – घराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता बँकेतून काढून स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बार्शीत घडली. याप्रकरणी दिपक सोमनाथ तलवाड (वय ४४, रा. दिव्यरत्न अपार्टमेंट, बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
तलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता त्यांनी भवानी पेठ येथील एचडीएफसी बँकेतून घराच्या बांधकामासाठी २ लाख रुपये काढले. ही रोकड त्यांनी आपल्या स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवली. त्यानंतर सोलापूर रोडवरील बालाजी कॉलनी परिसरात जुन्या घराजवळ स्कुटी उभी करुन ते यशवंत पान शॉप येथे गेले.
काही वेळाने दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर स्कुटीची डिकी अर्धवट उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डिकी तपासली असता त्यामध्ये ठेवलेली ५०० रुपयांच्या ४०० नोटांची, एकूण दोन लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळले.
आजूबाजूला चौकशी करुनही रोकड मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने डिकीमधून पैसे चोरुन नेल्याचा संशय व्यक्त करत तलवाड यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 13