सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून दगड डोक्यात घालून प्रथमेश बबन गायके (वय १९, रा. रविंद्र नगर, ताई चौक, सोलापूर ) या मित्राचा खून केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार मित्रांना अटक केली आहे. त्यापैकी एक मित्र अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधार गृहात ठेवण्यात आले आहे तर अटक करण्यात आलेल्या इतर तिघा मित्रांना आज शुक्रवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या. कुलकर्णी यांनी तिघा आरोपींना एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजय सुनील जाधव ऊर्फ घाटोळे (वय २५, रा. ताई चौक, नई जिंदगी), पियूष उर्फ पिन्या पप्पू गायकवाड (वय २१, रा. देसाई नगर, नई जिंदगी), साहिल रहमान शेख (वय २३, रा. नई जिंदगी सोलापूर) असे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यातील मृत प्रथमेश हा पेटींगचे काम करत होता. तो वडिलांना घर चालवण्यास हात भार लावत होता. बुधवारी सुट्टी असल्याने तो दिवसभर यातील आरोपी मित्रांसोबत फिरायला गेला, रात्री उशीरा घरी आला. त्यानंतर तो गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास घरातून गेला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह ताई चौकातील काटेरी झुडूपात आढळून आला होता. दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रथमेशचे वडील हे रिक्षा चालवत घराकडे जात असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोचून पाहिले असता प्रथमेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.त्यांनी लगेच मुलाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान याबाबत मृत मुलाचे वडील बबन हरी गायके (वय-४२ वर्षे, रा. घर नं ३५४ ताई चौक ,रविंद्र नगर , ज्ञानेश्वर गुजर यांचे घरात भाडयाने सोलापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे .गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करीत आहेत .
Post Views: 4