पंढरपूर – वारकरी संप्रदायातील संत-महंत, फडप्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संघटनांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संप्रदायाच्या रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे असे मत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष तथा औसा संस्थानचे प्रमुख गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. या बरोबरच देशात आणि राज्यात विविध ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या परंपरा, विचार आणि संतांच्या शिकवणीवर आघात करण्याचे प्रयत्न होत असताना, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाने एकसंघ राहून पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
वारकरी पाईक संघ आणि समस्त वारकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे सोमवारी (ता.२६) आयोजित वारकरी महाअधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या अधिवेशनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील विविध संघटना, संत-महंत आणि वारकरी बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अधिवेशनाचे उद्घाटन चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक राणा महाराज वासकर, माधव महाराज शिवणीकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवर महाराज मंडळी आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत व्यापक असून संतांच्या विचारांनी समाजाला भक्ती, समता, बंधुभाव आणि नैतिकतेचा मार्ग दाखविला आहे. मात्र संप्रदायातील विविध घटकांनी एकत्रितपणे काम केले नाही, तर संप्रदायाच्या विचारांची प्रभावी मांडणी करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे संत-महंत, फडप्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार आणि विचारवंत यांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून वारकरी संप्रदायाच्या व्यापक हितासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. संतांच्या शिकवणीचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचविणे आणि तरुण पिढीला वारकरी परंपरेची ओळख करून देणे, ही देखील काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या बरोबरच वारकरी संप्रदायाची जबाबदारी केवळ धार्मिक कार्यक्रम आणि वारीपुरती मर्यादित नसून तीर्थक्षेत्रांचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि नद्यांचे प्रदूषण रोखणे यासाठीही वारकऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देहू, आळंदी, पंढरपूर, पैठण आणि मुक्ताईनगर यांसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चंद्रभागा, गोदावरी आणि इंद्रायणी या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच निसर्ग आणि नदीसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक वारकऱ्याने स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.
———————
चौकट : ( केवळ वारकऱ्यांच्या संख्येत संप्रदायाची ताकद नाही )
वारकरी संप्रदायाची ताकद ही केवळ वारकऱ्यांच्या संख्येत नसून संतविचारांवरील श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजुटीत आहे. ही एकजूट अधिक बळकट झाली, तर संप्रदायाच्या परंपरा आणि मूल्यांचे जतन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा संदेश देखील या अधिवेशनातून वारकरी बांधवांना देण्यात आला.
———————
चौकट : ( विविध विषयांवर व्यापक जनजागृती व्हावी )
केवळ यात्रा किंवा वारीच्या काळात लाखो भाविक तीर्थक्षेत्रांमध्ये दाखल होतात. त्यामुळे या परिसरात स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि नदीपात्राचे प्रदूषण रोखणे या बरोबरच वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी देखील वारकरी संघटनांनी पुढे येवून व्यापक जनजागृती करावी, अशी अपेक्षा देखील या अधिवेशनाच्या निमित्ताने काही महाराज मंडळींकडून व्यक्त करण्यात आली.
———————-
चौकट : ( वारकरी महाअधिवेशनातून एकजुटीचा संदेश )
पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या या वारकरी महाअधिवेशनामुळे विविध वारकरी संघटना आणि महाराज मंडळींना एकत्र येऊन संप्रदायाच्या प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. संप्रदायाची एकजूट मजबूत करणे, संतविचारांचा प्रसार करणे, तरुण पिढीमध्ये प्रबोधन घडविणे आणि तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी सामूहिक प्रयत्न करणे, या दृष्टीने या अधिवेशनाचे महत्त्व अधोरेखित झाले.
Post Views: 13