सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सात विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली असून विशेष निवड सभेत अपर जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सातही सभापतींच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले.
महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा पार पडली. यावेळी महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी सहाय्य केले. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार प्रक्रिया पार पडली.
यावेळी पिठासीन अधिकाऱ्यांनी महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्या कडे दाखल नामनिर्देशन अर्जांची छाननी केली. अर्ज मागे घेण्याची १५ मिनिटे मुदत दिली आणि त्यानंतर एकमेव वैध अर्ज असल्याने संबंधित उमेदवारांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकमेव वैध उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सातही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यानंतर नवनियुक्त सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रक्रियेत लिपिक नितीन गायकवाड, शेखर सकट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
महापालिकेच्या सातही विषय समित्यांमध्ये भाजपाचे आठ आणि एमआयएमचा एक सदस्य असल्याने पक्षीय बलाबलामुळे सर्वच समित्यांवर भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही सदस्य या समित्यांमध्ये नसल्याने निवडणुकीत कोणतीही चुरस निर्माण झाली नाही.
निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांच्या गजरात नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सातही सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, विविध विषय समित्यांचे सदस्य, नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीत विधानसभा मतदारसंघांचा समतोल राखण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. शहर उत्तर मतदारसंघाला सर्वाधिक तीन सभापतीपदे मिळाली असून शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या दोन्ही मतदारसंघांना प्रत्येकी दोन सभापतीपदांचा मान मिळाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देत विषय समित्यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांना अधिक गती देणे, नागरिकाभिमुख निर्णय घेणे आणि प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विषय समित्यांची भूमिका महत्त्वाची असून आगामी काळात विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला.
या सभापतींची झाली बिनविरोध निवड
यामध्ये स्थापत्य समितीच्या सभापतीपदी विजय चिप्पा, विधी समितीच्या सभापतीपदी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनील खटके, शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी स्वाती बडगु, मंडई व उद्यान समितीच्या सभापतीपदी राजशेखर पाटील, कामगार व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रद्धा पवार तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निर्मला जंगम यांची बिनविरोध निवड झाली.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
राहण्याचा नूतन सभापतींचा मानस
दरम्यान, बिनविरोध निवड झाल्यानंतर सातही नवनिर्वाचित सभापतींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर व जिल्ह्यातील चारही आमदार तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व समन्वयाने काम करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विविध महापुरुषांच्या जयघोषाने दणाणला परिसर
त्यानंतर कौन्सिल हॉल समोर सर्व नूतन सभापतींसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. भाजपाने सामाजिक समतोल साधला होता. याप्रसंगी विविध महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. हलगीच्या कडकडाटात उत्साहपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा झाला.
शहराध्यक्ष तडवळकर यांनी
सभापती जंगम यांना गाडीत बसविले
भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती निर्मला जंगम यांना सभापतींच्या सजवलेल्या गाडीत बसवून शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9