बार्शी – तालुक्यातील पांगरी येथे शुक्रवार दि. ५ जून रोजी सकाळी झालेल्या ग्रामसभेत विकास कामांच्या मुद्द्यावरुन मोठा राडा निर्माण झाला. अंडरग्राऊंड गटार योजना, फुटलेली चेंबर्स तसेच गावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरुन वाद वाढत जाऊन माजी सरपंच पती आणि तक्रारदार ग्रामस्थ यांच्यात हाणामारी व हमरीतुमरीचा प्रकार घडला.
ही घटना पांगरी येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित ग्रामसभेदरम्यान घडली. ग्रामसभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेदरम्यान तक्रारदार ग्रामस्थांनी गावातील अंडरग्राऊंड गटार योजनेच्या कामांबाबत, अनेक ठिकाणी फुटलेल्या चेंबर्सबाबत आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या विषयांवर चर्चा सुरु असताना उपस्थितांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. काही वेळातच हा वाद चिघळून माजी सरपंच पती आणि काही ग्रामस्थ यांच्यात थेट धरपकड व हाणामारीपर्यंत पोहोचला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामसभेचे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले. उपस्थित ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर ग्रामसभा पुढे सुरु ठेवण्यात आली.
दरम्यान या घटनेप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ग्रामस्थांनी विकास कामांमध्ये पारदर्शकता राखावी, कामांचा दर्जा सुधारावा आणि गावकऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पांगरीकरांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामसभेत केली आहे.
या घटनेमुळे गावातील निकृष्ट विकास कामांच्या गुणवत्तेबाबत आणि अंमलबजावणीतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामस्थांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Post Views: 6