सांगोला – बर्फाच्छादित डोंगर, सतत बदलणारे हवामान अन् २२ किलोमीटरचा अत्यंत दुर्गम मार्ग अशी कठीण परिस्थिती असतानाही खांद्यावर सुमारे पावणे दोनशे किलो वजनाची कावड घेऊन पायी चालत जाऊन महूद (ता.सांगोला) येथील शिवभक्तांनी उत्तराखंड मधील केदारनाथाचे नुकतेच दर्शन घेतले. यावेळी केदारनाथ मंदिरासमोर हलग्यांच्या कडकडाटात कावड पारंपारिक पद्धतीने नाचविण्यात आली.
विविध ठिकाणच्या यात्रा मध्ये जाऊन तेथील मंदिरातील भगवंताला महूद येथील कावडीच्या साह्याने जलाभिषेक केला जातो. पारंपारिक पद्धतीने ही कावड हलग्यांच्या कडकडाटात नाचवली जाते. सुमारे एक महिनाभर महूद परिसरात अनेक ठिकाणी या कावडीचा भंडारा घातला जातो. अशा भंडाऱ्याचा लाभ हजारो भाविक घेतात. हलग्यांच्या निनादामध्ये खांद्यावर कावड घेऊन ती विशिष्ट पद्धतीने नाचविण्याचे कसब येथील तरुणांकडे आहे. काही तरुणांची दुसरी, तिसरी पिढी या कावडी मंडळात राबत आहे. ही कावड सुमारे पावणे दोनशे किलो वजनाची आहे. या कावडीचे हंडे खूप मोठे आहेत. अशी ही कावड कावडी मंडळातील शिवभक्तांनी स्वतः खांद्यावर केदारनाथ येथे घेऊन जाण्याचे ठरविण्यात आले.
१५ मे रोजी केदारनाथला रवाना झाले. धुळे, इंदोर, दिल्ली, हरिद्वार असा प्रवास करत ते हर की पौडी (उत्तराखंड) येथे दाखल झाले. येथील गंगामाता मंदिरास कावडीने जलाभिषेक केला. कावड पुढे गौरीकुंड येथे पोहोचली. सुमारे पावणे दोनशे किलो वजनाची कावड खांद्यावर घेऊन शिवभक्तांनी २१ मे रोजी स.७ वा. चालण्यास सुरुवात केली. अंधार पडल्यानंतर काही काळ विश्रांती घेतली. २२ मे रोजी स.७ वा ते केदारनाथ मंदिरासमोर पोहोचले. मंदिरासमोर हलग्यांच्या कडकडाटात कावड पारंपारिक पद्धतीने नाचविण्यात आली. केदारनाथाला जलाभिषेक करून सर्व शिवभक्तांनी दर्शन घेतले. त्यानंतर हरिद्वार, वृंदावन, मथुरा करत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरामध्ये आले. महाकालेश्वर मंदिराला कावड नाचवून जलाभिषेक केला आणि महूद येथे ही कावड मार्गस्थ झाली. या प्रवासादरम्यान सुवर्ण व्यापारी संजय दीडवाघ व रामचंद्र चव्हाण यांनी हरिद्वार येथे तर अमर जाधव यांनी पाचोरा जळगाव येथे निवास व भोजनाची सोय केली. केदारनाथ कावड यात्रा करून ही कावड महूूद येथे दाखल झाल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने गावात गाव भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने या ६३ कावड भक्तांचा सन्मान करण्यात आला.
चौकट-
सदर कावड यात्रेत बाबुराव नागणे, विजय नागणे, शिवरुद्र लोखंडे, ऋषिकेश महाजन, अभिषेक महाजन, वैभव भोसले, विजय नागणे, शिवप्रसाद बाजारे, गणेश बिडवे, मयूर तुपे, नाना मेटकरी, मनोज नागणे, महिंद्रा आसवे, दीपक नागणे, अमर शिलवंत, शिवम भोसले, अरिहंत डुडु, प्रीतम कांबळे, विनायक देशमुख, सचिन खांडेकर, पार्थ काकडे, सोमनाथ खांडेकर, गोटे, विजय बाजारे, महेंद्र खांडेकर, हिमालय देशपांडे, मनोज जगदाळे यांच्यासह ६३ शिवभक्त सहभागी झाले होते.