सोलापूर – रेल्वेच्या ७९ व्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत’ शनिवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट आणि जयहिंद कुर्डुवाडी संघांनी अनुक्रमे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी घोडदौड केली.
रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या पहिल्या सामन्यात मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटने पुष्प जिमखानावर १६ धावांनी मात केली. पुष्प जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट निर्धारित २० षटकांत ८ बाद १३० धावा केल्या. यामध्ये अभिषेक पवार (३०), सिद्धार्थ नाका (२७), विश्वनाथ मुंढे (नाबाद २५) आणि प्रवीण देशेट्टी (२१) यांनी योगदान दिले. पुष्प जिमखानाकडून प्रशांत घोडकेने १६ धावांत २ बळी घेतले, तर मयूर राठोड, अजय माने व प्रशांत काशिद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुष्प जिमखाना संघाला २० षटकांत ९ बाद ११४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून ओम जाधवने ३०, नदीम शेखने २३ आणि प्रशांत काशिदने १६ धावा केल्या. मध्य रेल्वेच्या वेदांत काळे (३/१६) आणि सिद्धार्थ नाका (३/२३) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पुष्प जिमखानाला पराभवाचा सामना करावा लागला. आदित्य दडेने २ तर शुभम मेडने १ बळी घेतला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ नाका याला रेल्वेचे वरिष्ठ खेळाडू अतुल देशपांडे यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी वासुदेव दोरनाल, राजा पटेल, लियाकत शेख, गौतम बनसोडे आणि अंबादास तोरा उपस्थित होते. सोहेल शेख व अनिल सलगर यांनी पंच म्हणून, तर साई पवार यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
दुपारच्या सत्रात जयहिंद कुर्डुवाडीने नाईट रायडर्सवर ६ गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना नाईट रायडर्स ९१ संघाने २० षटकांत ७ बाद ११८ धावा केल्या. सोमेश्वर तंबाके (३५ धावा), शुभम कांबळे (३५ धावा) आणि राहुल बंदपट्टे (२१ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. जयहिंद कुर्डुवाडीकडून समाधान जगतापने १४ धावांत २ बळी घेतले. तर सचिन सुरवसे, मकरंद जाधव व दिनेश कणसे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
११९ धावांचे लक्ष्य जयहिंद कुर्डुवाडी संघाने अवघ्या १३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा करत सहज पार केले. दिनेश कणसे (३१ धावा), मकरंद जाधव (३१ धावा) आणि रितेश कोनले (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नाईट रायडर्सकडून अमोल आलमेलकरने २, तर शुभम कांबळे व राहुल बंदपट्टे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
दिनेश कणसे याला नागेश्वर राव यांच्या हस्ते सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विक्रांत पवार उपस्थित होते. महेश सोनवणे व अनिल सलगर यांनी पंच म्हणून, तर साई पवार यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
आजचे सामने
सकाळी : मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, सोलापूर विरुद्ध जयहिंद कुर्डुवाडी
दुपारी : विजापूर क्रिकेट क्लब विरुद्ध साऊथ सोलापूर आपटे रेड.





















