सोलापूर – ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील विविध रस्ते बांधकाम व दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल १० कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संस्कृती राम सातपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून तालुक्यातील अनेक गावांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून काही रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णवाहिका सेवांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्ते नेटवर्क मजबूत करण्यासाठी विविध गावांतील नवीन रस्ते बांधकाम आणि रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रस्ते चांगले असल्यास शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेणे सोपे होते, विद्यार्थ्यांचा शाळा-कॉलेजपर्यंतचा प्रवास सुलभ होतो तसेच आरोग्य व आपत्कालीन सेवांचा लाभ वेळेत मिळू शकतो. त्यामुळे या निधीमुळे केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी या मंजुरीचे स्वागत केले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर होत असून समाजकल्याण सभापती संस्कृती राम सातपुते यांच्या पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक गावांच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोट
रस्ते विकास कामांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील वाहतूक, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळणार असून माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासात हा निधी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
– संस्कृती सातपुते, सभापती समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
पहिल्या टप्प्यात मोरोची–साळुंखेवस्ती, किर्दकवस्ती–दहिगाव, धर्मपुरी–कर्चेवाडी, मोरोची–सोनपेट, इस्लामपूर–भंडोबा देवस्थान, दहिगाव–सावंतवस्ती, अंलकापुरी, पुरबावी, शिदेवाडी, बाभुळगाव, नातेपुते, फडतरी यांसारख्या भागांतील महत्त्वाच्या ग्रामीण मार्गांचा समावेश आहे. प्रत्येक कामासाठी सरासरी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे ग्रामीण रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
चौकट
दुसऱ्या टप्प्यात रेडे, गुरसाळे, मुंजवडी, कचरेवाडी, डोंबाळवाडी, कराळवस्ती, पिलीव, हिंगणी, तांदुळवाडी, लोंढेवाडी, विरपुरी आदी भागांतील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामेही मंजूर करण्यात आली आहेत. खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी या कामांना विशेष महत्त्व दिले जात आहे.
Post Views: 59