सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळा स्थापनेच्या कामाला गती मिळाली असून हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुतळा स्थापनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे , नगरसेवक गौतम कसबे, कामगार नेते अशोक जानराव, सर्पमित्र दीपक इंगळे, चंद्रकांत सोनवणे, सुमन लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विचारांचा व त्यागाचा वारसा जपणारे हे उद्यान सोलापूरच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वैभवात महत्त्वाची भर घालणारे ठरणार आहे.
दरम्यान, उद्यानातील उर्वरित विकासकामे अपूर्ण न ठेवता ती जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली.
माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळा स्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि भीमसैनिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळत असल्याने आंबेडकरी अनुयायांसह उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Post Views: 8