सोलापूर : प्रस्तावित उड्डाणपूल हे सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. या कामांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळ व इंधनाची बचत होईल. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रक्रिया गतीमान करावी. हे प्रकल्प प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पांच्या कामांचा आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. महापालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर कक्षात झालेल्या बैठकीत जुना पुणे नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आक्कुलवार, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, सहायक नगररचना संचालक समीर सितोळे, नॅशनल हायवे विभागाचे सुनील फुलारी, एस. पी. काळे, महेश येमूल, उद्धव कांबळे, विजय काकडे, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनासह रेल्वे, पोलीस, पोस्ट, बीएसएनएल, संरक्षण विभाग आणि खासगी मालमत्ता धारकांच्या जागांबाबत आवश्यक समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.महापौर कोंड्याल यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
या विषयांचा घेण्यात आला आढावा
यावेळी प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या जागांचा तपशील संबंधित विभागांनी सादर केला. उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन संपादन, हस्तांतरण, ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी), तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.
Post Views: 12