मुदखेड – तालुक्यातील बारड येथील तेलंगणा ,आंध्र प्रदेश , मराठवाडा, विदर्भातील जागृत देवस्थान तसेच भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शितलादेवी (पोचम्मा ) देवीच्या यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असुन. यानिमित्त हनुमान मूर्ती पालखी मिरवणूक ग्रामस्थांच्या वतीने काढण्याची प्रथा असुन कुस्त्यांचा फडही रंगणार आहे .
पोचम्मा देवीचे पुरातन काळातील भव्य वडाच्या झाडाखाली वसलेले मंदिर आहे . शीतला मातेचे वास्तव्य विहिरीत असल्याचे सांगितले जाते . थोर स्वातंत्र्य सेनानी साहेबराव देशमुख बारडकर यांनी देवस्थानासाठी चार गुंठे जागा दान दिली आहे . चैत्र वैशाख पौर्णिमेला दरवर्षी यात्रा भरत असते या निमित्त लाखो भक्त चंद्रपूरच्या देवीचे दर्शन घेऊन शीतला देवीच्या दर्शन घेण्याची प्रथा रूढ आहे . चंद्रपूरच्या आईची धाकटी बहीण म्हणून पोचम्मा देवीची ओळख आहे . भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने तेलंगणा , आंध्र प्रदेश , विदर्भ , मराठवाड्यासह जिल्ह्यातील भक्त नवसाची परतफेड करण्यासाठी मनोभावी आराधना करतात . नवरात्र महोत्सवात ओटी भरण्यासाठी सुहासिनीची लगबग असते . नवरात्र अष्टमीला तांबोल व दुधाचा प्रसाद वाटप केला जातो . संस्थांच्या वतीने दरवर्षी पाडव्यानिमित्त शितला देवीचे बैलगाडीतून आंबील काढण्याची पद्धत आहे .
ग्रामस्थांच्यावतीने दरवर्षी हनुमान जयंतीला यात्रा महोत्सव निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढली जाते . शंभर वर्षांपूर्वीची सुंदर आकर्षक लाकडी नागोबा कुंभार यांनी तयार केलेल्या मूर्तीची गावातील प्रमुख रस्त्यावरुन भक्तीमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात येत असते यावर्षी दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे . यामध्ये सर्वधर्मीय युवक सहभागी होत असतात.ग्रामपंचायत च्या वतीने यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल दि.३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचा फड रंगणार आहे . यानिमित्त पैलवानांसाठी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली आहे . प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये ठेवण्यात आले आहे . याशिवाय अनेक आकर्षक बक्षीसे पैलवानांना देण्यात येणार आहेत .

















