बार्शी – तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत एका तरुणाला विनापरवाना गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सागर साहेबराव ढोरे-पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बार्शी परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, धसपिंपळगाव रोडवरील शेलगाव फाटा (ता. बार्शी) येथे एक संशयास्पद इसम थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला आणि सुनील शिवलिंग मिटकरी (वय-३५, रा. सुभाषनगर, तळवाडा, बार्शी) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी सुनील मिटकरी याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तुल मिळून आले. या पिस्तुलला मॅगझिन असून त्याचे मूठ दोन्ही बाजूस चॉकलेटी रंगाच्या पट्टीचे आहे व त्यावर सोनेरी रंगाचे स्टार असलेले डिझाईन आहे. या जुन्या वापरत्या पिस्तुलची किंमत ६० हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय त्याच्याकडे प्रत्येकी २०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आणि १० हजार किंमतीचा एक रीयलमी मोबाईल, असा एकूण ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तुल सुमारे ४ ते ५ महिन्यांपूर्वी ओंकार लाटे (राहणार बीड) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिस्तुल पुरवणाऱ्या बीड येथील ओंकार लाटे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
Post Views: 7