टेंभुर्णी – वेणगाव पुलाजवळ कार आडवी लावून तरुणाचा मार्ग रोखत लाकडी दांडक्याने वाहनावर हल्ला करून काचा फोडल्याची खळबळजनक घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. एवढ्यावरच न थांबता संबंधितांनी पुन्हा रस्ता अडवून कारवर दगडफेक केल्याचा आरोप असून, या दगडफेकीत गौरव नाळे हे जखमी झाले. या प्रकारामुळे वेणगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
केदार दत्तात्रय नाळे (वय २५, रा. नाळे वस्ती, भवानीनगर, टेंभुर्णी) यांनी टेंभुर्णी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मोन्या महालिंगडे, सौरभ पवार, रितेश महालिंगडे, ऋषीकेश कोटवळे, आनंद घाडगे, अमर मुजावर व सागर महाडिक यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
केदार नाळे हे त्यांचा भाऊ गौरव नाळे व सुजय माने यांच्यासोबत एमएच १३ बीएन ८२४७ क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून शेटफळ येथील मार्केटमधून सोलापूर-पुणे महामार्गाच्या दिशेने जात होते. दुपारी सुमारे एक वाजता त्यांची कार वेणगाव पुलाजवळ आली असता, वस्ती पुलाखाली काळ्या रंगाची क्रेटा कार आडवी लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कारजवळ काही व्यक्ती उभ्या असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पुढे जाण्याचा प्रयत्न करताच संबंधितांनी लाकडी दांडक्याने स्विफ्टवर हल्ला करून काचा फोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर केदार नाळे यांनी वाहन पुढे नेले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी डायल ११२ वर मदतीसाठी फोन केला. त्यानंतर कूर्डुवाडी पोलिसांची गाडी घटनास्थळी आली. संबंधितांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची कारवाई सुरू असतानाच टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडून फोन आल्याने केदार नाळे टेंभुर्णीच्या दिशेने निघाले.
मात्र, वेणगाव येथील अतिथी हॉटेलसमोर पुन्हा रस्ता अडवून कारवर हल्ला व दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. जीव वाचवण्यासाठी केदार नाळे यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दगडफेकीतील एक दगड गौरव नाळे यांना लागल्याने ते जखमी झाले.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी तक्रारीतील आरोपांच्या आधारे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, घटनेमागील नेमके कारण, पार्श्वभूमी आणि संबंधितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 7