सोलापूर – जिल्हा परिषदेत दीर्घकाळ एकाच विभागात किंवा कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय बदल्यांची प्रक्रिया आता वेगाने राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार एकाच ठिकाणी सलग पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विभागनिहाय वेळापत्रक जाहीर केले असून, संबंधित विभागांना १० जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती उत्तर सोलापूर आणि पंचायत समिती दक्षिण सोलापूर या कार्यालयांतील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागाने पूर्वतयारी पूर्ण करून निर्धारित मुदतीत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामध्ये सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन, प्राथमिक शिक्षण, वित्त, आरोग्य तसेच बांधकाम, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा अशा आठ विभागातील विविध संवर्गांचा समावेश आहे. विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व यांत्रिकी कर्मचारी, चालक, लिपिक आदी संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या या प्रक्रियेत करण्यात येणार आहेत.
चौकट
विभागनिहाय प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित विभागांनी पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह १० जुलैपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावेत, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
चौकट
विशेष सवलत किंवा प्राधान्य नाही
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बदली प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याला विशेष सवलत किंवा प्राधान्य दिले जाणार नाही. आजारपण, हृदयशस्त्रक्रिया, अपंगत्व, कर्करोग, अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, दिव्यांग पालक अथवा मेंदूविकार अशा कारणांचा उल्लेख असला तरी शासन नियमांनुसारच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना १० जुलैपासून कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पॉइंटर
महत्त्वाचे मुद्दे
पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या.
विभागनिहाय वेळापत्रक जाहीर.
१० जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.
सर्व प्रक्रिया शासनाच्या बदली धोरणानुसार.
प्रशासनाकडून पारदर्शक व वेळबद्ध अंमलबजावणीवर भर.
कोट
विविध विभागांमध्ये कामकाजाला मिळणार नवी गती
जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून, यामुळे विविध विभागांमध्ये कामकाजाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर