सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विभागातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘एचटीई सेवार्थ’ (HTE Sevarth) प्रणालीमध्ये आपली ई-केवायसी (e-KYC) त्वरित पूर्ण करावी, असे आदेश उच्च शिक्षण विभागाच्या सोलापूर विभागीय सहसंचालक डॉ अजयकुमार जाधव यांनी दिले आहेत.
ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे जुलै-२०२६ चे वेतन अदा केले जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे. वित्त विभागाच्या २७ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, विभागीय सहसंचालक कार्यालयाने या संदर्भात ६ जुलै २०२६ रोजी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याची खात्री करून, महाविद्यालयांनी तसे प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला सादर करावे लागणार आहे. त्यानंतरच या माहितीला प्रणालीमध्ये ‘Approve’ केले जाईल. या प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास जुलै महिन्याचे वेतन रोखले जाणार असल्याने विद्यापीठ प्रशासन व सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
——
ई-केवायसीसाठी खालील प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक
१. आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते किंवा एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये दिलेल्या बँक खात्याची आधार कार्डाशी जोडणी करून माहिती अद्ययावत करणे.
२. पॅन (PAN) क्रमांक व आधार क्रमांक योग्य असल्याची खात्री करणे आणि आवश्यक असल्यास त्यात दुरुस्ती करून घेणे.
३. सोबत जोडलेल्या ई-केवायसी फॉर्ममध्ये कर्मचाऱ्याची माहिती भरून, संबंधित बँकेकडून त्याची पडताळणी करून घेणे. बँकेचा शिक्का व स्वाक्षरी असलेली ही प्रत स्कॅन करून कर्मचाऱ्याच्या नावासमोर अपलोड करणे आवश्यक आहे.
४. एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये ‘Worklist > Payroll > Employee Information > Update Employee Details (e-KYC)’ या पर्यायावर जाऊन ही माहिती अद्ययावत करावी लागणार आहे.
५. सर्व माहिती भरल्यानंतर ती ‘Forward to Level 2 DDO’ या टॅबवर क्लिक करून पुढे पाठवावी लागेल.


















