सोलापूर – उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौरऊर्जा, अणुऊर्जा (एसएमआर) आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा विरोध तीव्र झाला आहे. या प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी, वारकरी आणि मच्छिमारांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील रांजणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील आमदारांसह विरोधी पक्षांचे नेतेही आंदोलनात सहभागी झाल्याने उजनी प्रकल्पांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
उजनीच्या पाण्यावर प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना स्थानिकांनी विरोध केला आहे. एआय डेटा सेंटरसाठी तब्बल नऊ टीएमसी पाण्याची गरज भासणार असल्याचा दावा आंदोलकांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि मच्छिमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. स्थानिकांना रोजगार मिळण्याऐवजी पारंपरिक व्यवसाय धोक्यात येतील, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनात महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, नारायणआबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, आमदार अभिजित पाटील, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले.
चौकट
महाराष्ट्राच्या वाट्याला पाणीखाऊ प्रकल्पच?
सेमीकंडक्टरसारखे रोजगारनिर्मिती करणारे प्रकल्प गुजरातकडे जात असताना महाराष्ट्रात मात्र पाणी आणि पर्यावरणावर परिणाम करणारे प्रकल्प आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पाणीहक्काशी तडजोड का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
चौकट
जनसुनावणीशिवाय प्रकल्प नको
स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि जनसुनावणी न करता कोणताही प्रकल्प पुढे नेला जाणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट करत प्रकल्पांचे संभाव्य परिणाम जनतेसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली. सरकारने स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा वापर, स्थानिकांचे हक्क आणि परिसराच्या विकासाचा प्रश्न आता संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Post Views: 18