सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरणारे सुहास कदम हेच अवैध सट्टा व मटका व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हे यांनी कदम यांच्यावर विनयभंग, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांवर हल्ल्याचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. तसेच सरकारी नोकरी व टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिक व महिलांकडून पैसे उकळणे, काही राजकीय नेत्यांची नावे वापरून फसवणूक करणे आणि अवैध सट्टा-मटका व्यवसायाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला.
यापूर्वी आंदोलनाच्या नावाखाली खंडणी उकळल्याचा तसेच पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप कोल्हे यांनी केला. काही महिलांची फसवणूक झाल्याचा दावा करत संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
आरटीजीएस व्यवहारांचे पुरावे
माझ्याकडे, आरोप खोटे : सायरा शेख
३० जून रोजी आपण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून, त्यानंतरच सुहास कदम यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केल्याचा दावा सायरा शेख यांनी केला. “मी व्याजाने पैसे देते” हा आरोप पूर्णपणे खोटा असून संबंधित आर्थिक व्यवहार बँकेद्वारे (RTGS) झाल्याने सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःप्रमाणेच अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा दावा करत त्यांनी पीडित महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले. महिलांचा राजकीय हेतूंसाठी वापर करू नये, अशी भूमिका मांडत पुन्हा आपली बदनामी केल्यास संबंधितांविषयीची माहिती सार्वजनिक करणार, असा इशाराही सायरा शेख दिला.
Post Views: 8