टेंभुर्णी – करमाळा रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडलेल्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या दरोड्याचा टेंभुर्णी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत तब्बल २ कोटी ७० लाख ११ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व महागडे ॲपल मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील साडी व्यापारी बाहुबली एन. मुत्तीन यांच्या दुकानातील मॅनेजर धुंडाप्पा रामान्ना खलाटे (वय ३५, रा. गोटयाळ, ता. चडचण) यांना मालकांनी सुरत येथे माल खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची रोख रक्कम दोन पोत्यांमध्ये देऊन पाठविले होते. ही रक्कम आयशर टेम्पो (एमएच ४५ एएफ १५१६) मधून टेम्पो मालक नागनाथ सुर्वे व सुनील सुर्वे यांच्यासोबत नेण्यात येत होती.
दिनांक ११ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २.१५ ते २.२० वाजण्याच्या दरम्यान टेंभुर्णी-करमाळा रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळील वळणावर अचानक गजरी रंगाची विनानंबर स्विफ्ट कार टेम्पोसमोर आडवी लावण्यात आली. कारमधून उतरलेल्या चार जणांनी चाकूचा धाक दाखवत टेम्पो थांबविला. फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर टेम्पोच्या टपावर ताडपत्रीत बांधून ठेवलेली पैशांची दोन्ही पोती खाली उतरवून आरोपींनी ती स्विफ्ट कारमध्ये टाकून धूम ठोकली.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), १२६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची सूत्रे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या हाती देण्यात आली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे संजय जगताप यांनी दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम अजित नामदेव सुर्वे (रा. मोडनिंब) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी सिद्धेश्वर नामदेव माने याला सुरत, गुजरात येथून तर शुभम शहाजी पाटील याला मोडनिंब परिसरातून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार विकी राजाभाऊ गिड्डे याची असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात सिद्धेश्वर माने याने चोरीतील काही रक्कम आपल्या दाजी सुरज देविदास उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांना दिल्याची माहिती समोर आली. त्यातून सोन्याची खरेदी करण्यात आल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली.
पोलीस कोठडीत कसून चौकशीदरम्यान आरोपींनी मोडनिंब येथून टेम्पोचा पाठलाग करून नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. चोरीच्या रकमेतून आरोपींनी तीन महागडे ॲपल मोबाईल व सोन्याचे दागिने खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी २ कोटी ६२ लाखांची रोख रक्कम, ५ लाख ४९ हजार ४४० रुपयांचे सोने तसेच २ लाख ६१ हजार ९९० रुपयांचे तीन ॲपल मोबाईल असा एकूण २ कोटी ७० लाख ११ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, करमाळा विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आत्राम हे करीत आहेत. आरोपींना २८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई राहुल आत्राम, संजय जगताप, ज्ञानदेव वाघ, विजय गोसावी, अमित बाबर, अजित मोरे, खाजाभाई मुजावर, नारायण गोलेकर, प्रकाश काटकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
Post Views: 15