सोलापूर – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निर्माण झालेल्या श्वानदंश प्रतिबंधक लस अर्थात रेबीजच्या टंचाईवर मात करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून तब्बल एक हजार लसी उसनवारीने आणल्या आहेत. शासनाकडून अतिरिक्त साठा मिळेपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील श्वानदंश लशीच्या टंचाईचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. अनेक ग्रामीण भागात रुग्णांना लस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच या लशींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही सदस्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने हालचाल करत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून एक हजार लसी उपलब्ध करून घेतल्या. शासनाकडून नवीन साठा प्राप्त झाल्यानंतर या लसी परत केल्या जाणार असल्याचे डॉ. कोपुरवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी विशेष तयारी सुरू असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. कोपुरवाड यांनी सांगितले.
Post Views: 16