बार्शी – बकरीद ईद (ईद-ऊल-अजहा) इस्लाम धर्मातील एक प्रमुख सण आहे. त्याग आणि बलिदानाचा सण म्हणून याची मान्यता आहे. इस्लामी कॅलेंडरनुसार जिलहज महिन्याच्या १० तारखेला हा सण सर्वत्र साजरा केला जातो.
बार्शी शहरात देखील हा सण गुरुवार दि. २८ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी शहरातील विविध ईदगाह आणि मशिदीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्रीत येत सामूहिक नमाज पठण केले.
शहरातील मुख्य असणारा नाईकवाडी ईदगाह येथे परंपरेप्रमाणे प्रथमत: इमाम व खतिब मौलाना अन्वारुल हक यांचा नाईकवाडी परिवाराच्यावतीने वसीम नाईकवाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मौलानाच्या नेतृत्वात सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सर्व समाजबांधवांनी आपसात गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, विविध सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईदगाह मुतवल्ली (व्यवस्थापक) शफीक नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्यासह विविध व्यवस्था करण्यात आली होती. फारुक नाईकवाडी, तौफिक नाईकवाडी, वसीम नाईकवाडी, नदीम नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, प्राचार्य अब्दुलरहेमान शेख, उद्योजक इक्बाल पटेल, इम्तियाज तांबोळी, आदम तांबोळी यांचे खूप सहकार्य लाभले.
मलिक ईदगाह येथे मौलाना सैफ मदनी तर निजामुद्दीन ईदगाह येथे मौलाना मुफ्ती सलामत यांच्या नेतृत्वात नमाज अदा करण्यात आली. नमाज आणि दिवसभराच्या उत्सवात सुरळीतपणा येण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. ईद उत्साहात पार पडण्यासाठी तहसीलदार एफ.आर. शेख, विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नगरपरिषद मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
Post Views: 17