सोलापूर – जुळे सोलापूर परिसरातील अष्टविनायक नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा कॉलनी येथील नागरिकांची तब्बल २५ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून सन २०२६-२७ अंतर्गत ८ लाख ४७ हजार २५० रुपयांचा निधी सभामंडपासाठी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर यांच्या देखरेखीखाली सभामंडपाचे काम करण्यात येणार असून, कामाचा प्रारंभ आदेश सप्टेंबर २०२६ मध्ये देण्यात आला आहे. सभामंडपामुळे अष्टविनायक नगरमधील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.
यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन विश्वनाथ व्हनकोरे यांनी गेल्या २५ वर्षांत सभामंडपासाठी केलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेतला. प्रभाग २४, जुळे सोलापूर तसेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विविध लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे अपेक्षित लक्ष देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी मागणीची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व्हनकोरे यांनी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले. “२५ वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी आता प्रत्यक्षात साकारत आहे. शब्द न देता कृतीतून काम करून दाखविल्याबद्दल आम्ही खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आभारी आहोत,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. देवयानी यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव व्यंकटेश वैकुंठे, खजिनदार सुभाष सदाफुले, ज्येष्ठ संचालक मोहन डांगे, मारुती कटारे, गौरीशंकर जेऊरे, सुनील सुरवसे, संचालिका रेखा गायकवाड, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनम कोळी यांच्यासह पदाधिकारी, सभासद, अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 21