बार्शी – पुण्यात सुरु असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आपली भूमिका मांडतानाच रोहित पवार यांच्यावर नावानिशी जोरदार टीका केली.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील भरपूर विद्यार्थी पुण्यात येऊन अभ्यास करतात. ही सर्वसामान्य शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातील मुलं आहेत. गेले तीन दिवस विद्यार्थी बंधू-भगिनी मला सांगत होते की, राजाभाऊ तुम्ही या ठिकाणी भेट द्या, आमच्या अडचणी समजून घ्या. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मांडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत,” असे राऊत म्हणाले.
आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याच्या चर्चेवरही राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ‘हे आंदोलन भारतीय जनता पार्टीने उभं केलं असं वातावरण निर्माण केलं जातंय. भाजपला आंदोलन उभं करायचंच असतं तर आमच्या प्रत्येक आमदाराने २००-५०० मुलं पाठवली असती, आम्हाला काय अडचण होती?’ असा सवाल त्यांनी केला.
यानंतर रोहित पवारांचा उल्लेख करत राऊत अधिक आक्रमक झाले. ‘दादा तुम्ही नाव का नाही घेत? मी नावानिशी उल्लेख करणार. पहिल्यापासून ओळखतोय, विघ्नसंतोषी माणूस आहे. गेली २० वर्षे ओळखतो. मी विनाकारण कुणावर टीका करणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये जाती-पातीचे किंवा राजकीय विषय आणू नयेत, असे सांगताना राऊत म्हणाले, ‘कुणाची लेकरं कुठे द्यायची, कुठल्या जाती-पातीमध्ये कशा पद्धतीने दरी निर्माण करायची, हा प्रयोग राज्यात सातत्याने केला जातोय. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत. सर्वसामान्य शेतकरी आणि गोरगरिबांची लेकरं इथे आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहू.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट बैठक घालून देण्याची तयारीही राऊत यांनी दर्शवली. ‘तुम्ही पवार यांनाही घेऊन या. मी साहेबांना बोलतो. समोरासमोर चर्चा करा. प्रत्येक प्रश्न साहेबांना विचारा आणि अख्ख्या राज्यासमोर लाईव्ह करा. कधी बैठक ठेवायची ते सांगा, काय अडचण आहे?’, असे आव्हान त्यांनी दिले.
आंदोलनातील मागण्यांच्या दिशेबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला. ‘गॅदरिंग करायची, गोंधळ करायचा, हातात बंदुका घेऊन येतो म्हणायचं… ही कुठली भाषा आहे? नेमकं कुठं चाललंय? नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय आंदोलन? मागण्या नेमक्या कुठे भरकटत चालल्या आहेत, याचा विचार झाला पाहिजे’, असे राऊत म्हणाले.
शेवटी विद्यार्थ्यांना आश्वासन देताना त्यांनी स्पष्ट केले, ‘तुम्ही ज्यावेळी सांगाल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहू. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून द्यायला आम्ही तयार आहोत. ‘
‘याला राजकीय कलर देत असतील तर आम्हालाही शांत बसून जमत नाही. शेवटी ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी!’ अशा शब्दांत राऊत यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला.
Post Views: 18