बांगलादेशची राजधानी ढाकात गुरुवारी रात्री ९.५० वाजताच्या सुमारास एका सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये आग लागली. ही आग त्वरीत वरच्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीत ४४ जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी आहेत. याबाबत आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी पुष्टी केली आहे.
आरोग्य मंत्री डॉ. सेन यांनी ढाका येथे मध्यरात्री २ वाजता भेट देत दुर्घटनेची माहिती जाणून घेतली. बांगलादेश अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री ९.५० वाजताच्या सुमारास आग लागली आणि ही आग त्वरीत वरच्या मजल्यापर्यंत पसरली. यामध्ये रेस्टॉरंटसह कपड्यांचं मोठे नुकसान झालं आहे.
सात मजली इमारतीतून ७५ लोकांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी ४२ लोक बेशुद्ध आहेत. अग्निशमन दलाच्या १३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री सेन म्हणाले, ‘ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (डीएमसीएच) ३३ जणांचा मृत्यू झाला. तर, शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन्ही रुग्णालयात मिळून २२ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरूवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याने लोक घाबरले आणि वरच्या मजल्याकडे धावले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. नंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिडीचा वापर करून इमारतीच्या वरच्या मजल्यावरून अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एका पीडितेने सांगितले की, आग लागल्यानंतर मी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली. जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या काचा फोडून खाली उडी मारावी लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.