माढा : विठ्ठल प्रतिष्ठान संचलित व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त आर्या पब्लिक स्कूल, माढा येथे सुरक्षित बालपण अभियाना अंतर्गत बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ या विषयावर कायदेशीर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, माढा येथील अध्यक्ष मा. श्री. एम. बी. कुडते साहेब होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व, बालकांचे हक्क, सुरक्षिततेबाबतची जागरूकता आणि सुरक्षित बालपण अभियानाची उद्दिष्टे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधिवक्ता रत्नप्रभा जगदाळे आणि अधिवक्ता नवनाथ तांबिले यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमाची सविस्तर माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, वैयक्तिक सुरक्षितता, चांगला व वाईट स्पर्श यातील फरक आणि कोणताही अनुचित प्रसंग घडल्यास पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडे तात्काळ मदत मागण्याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी संजय डुरके आणि माळवदकर हे उपस्थित होते. या शिबिरामध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे प्राचार्य सागर थोरात, संस्थेचे सदस्य संभाजी पाटील दत्तात्रय चव्हाण, मनोज नागटिळक, श्री. जयदेव गायकवाड, अतुल लंकेश्वर, शुभम पूरवत, संध्या सरडे,वंदना गोसावी, स्नेहल कांबळे आणि प्रथमेश टिंगरे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी आयोजित केलेले हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.
Post Views: 12