बार्शी – तालुक्यातील जामगाव (पा) येथे मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ऊसाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे ३० एकरांतील ऊसाचे नुकसान झाले आहे. या आगीत जवळपास १० ते १२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आगीत जीवन मस्के, समाधान मस्के, अंगद जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, सुखदेव जगदाळे, नितीन खंदारे, आनंद खंदारे, किशोर खंदारे, बळी सातपुते, नंदू मस्के, पांडुरंग मस्के, सोपान सातपुते यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले आहे. दुपारी अचानक ऊसाच्या शेतात आग लागल्यानंतर वाऱ्यामुळे आग आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ऊसापर्यंत पसरत गेली. आगीचा फैलाव वाढत असल्याचे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत विहिरी व बोअरवेलमधील पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. बार्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अचानक लागलेल्या आगीमुळे ऊसाचा पीकाचे नुकसान झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच तालुक्यात दुष्काळ परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाईमुळे होत असलेल्या फळबागा पिकांचे नुकसान व शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर या घटनेमुळे नवे संकट उभे राहिले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी अपेक्षा आगीत नुकसान झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
Post Views: 13