भंडारा, ३० जून, (हिं.स.) : साकोली येथील उड्डाणपुलावर रायपूरवरून नागपूरच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डॉ. सुफल गजभिये हे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी रायपूर वरून चारचाकी कारने कुटुंबासह नागपूरच्या दिशेने जात होते. साकोली उड्डाणपुलावर काही वेळापूर्वी रिमझिम पावसामुळे पाणी साचल्याने त्यांची कार स्लीप होऊन दुभाजकावर धडकली. कार भरधाव वेगात असल्याने कार स्लीप होऊन दुभाजकावर जोराने धडकली. कारमध्ये असलेल्या डॉक्टर सुफल गजभिये यांच्या आई कांता गजभिये (वय अंदाजे ८५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी डॉ. सुफल गजभिये (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा शिवान गजभिये (वय १४) हा जखमी अवस्थेत उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे हलविण्यात आले.