सोलापूर – शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, ज्या शिक्षकांची सेवा निवृत्तीसाठी ५ वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे, त्यांना दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास, दोन वर्षांनंतर सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल.
या निर्णयामुळे राज्यातील इयता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांच्या सेवेला संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात आला. या मुक मोर्चात जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षकांच्या २५ पेक्षा जास्त शिक्षक संघटना एकवटल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजता चार हुतात्मा चौक येथून मुक मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी हजारो शिक्षकांच्या हातामध्ये ‘ आमचा अनुभव हीच आमची पात्रता, अन्यायकारक टिईटी रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, लढाई अस्तित्वाची,टिईटी सक्ती विरोधाची ‘ या आशयाचे फलक होते. मुक मोर्चा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आल्यावर या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना, आपल्या शिक्षक संवर्गात एकी नाही, आपण सगळं सहन करतो यामुळेच आपल्यावर आज ही वेळ आली आहे.
शिक्षक संवर्गावर १५ मार्च २०२४ ची अन्यायकारक संचमान्यता लादून शिक्षणसेवक योजना लागू केली, जुनी पेन्शन योजना बंद केली, प्राथमिक शाळांमधून लिपिक शिपाई पदे बंद करणे, बीएलओचे काम लावले, १५० पेक्षा जास्त ऑनलाईन कामे लावली, अशा कित्येक बाबी शासनाने आपल्यावर लादल्या.
टीईटी सक्तीच्या विषयाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसह १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणसेवक पद रद्द करणे, शिक्षकांना दिली जाणारी सर्व ऑनलाईन कामे त्वरित बंद करावीत , सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आणि वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवाकालात ग्राह्य धरावी या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना देण्यात आले.
टीईटी संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून, अनेक जिल्हा परिषदेच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत. पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे.
आश्रमशाळेतील शिक्षकांना तर टीईटी उत्तीर्ण न झाल्यास वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, अण्णासाहेब भालशंकर, शामराव जवंजाळ, कल्लाप्पा फुलारी, शिवानंद भरले, बापूसाहेब आडसुळ, निलेश देशमुख, प्रतिभा पांडव,डॉ बी. पी. रोंगे, संजीव चाफाकरंडे, भीमराया कापसे, इत्यादी शिक्षक संघटना नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चाचे प्रास्ताविक विरभद्र याडवाड यांनी केले. सूत्रसंचालन रविराज खडाखडे यांनी केले तर संभाजी फुले यांनी सर्वांचे आभार मानले.
या मोर्चाला शिक्षक सेनेचे राज्य प्रमुख रमेश चौगुले, सुनिल चव्हाण, सुजित काटमोरे, इक्बाल नदाफ, रवी देवकर,रामभाऊ शिंदे,सचिन चौधरी, आप्पासाहेब पाटील, सुधीर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

















