सांगोला – दिपकआबा यांनी आपल्या मातोश्री शारदादेवी यांची केलेली मातृसेवा संपूर्ण तालुक्याने पहिली आहे. आपल्या आई आणि वडिलांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारांची आणि संस्काराची पालखी अविरतपणे घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केल्याने आई वडिलांची सेवा करणारा आधुनिक युगातील भक्त पुंडलिक म्हणजे दिपकआबा असे प्रतिपादन हभप.डॉ.बिरा बंडगर महाराज यांनी केले. स्व.शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त बुधवारी जवळा, ता.सांगोला येथे स.९.३० वा.पासून तालुक्यातील असंख्य भजनी मंडळांनी केलेल्या प्रभात फेरीमुळे वातावरण अध्यात्मिक बनले होते.
स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील, स्व.शारदादेवी साळुंखे पाटील आणि स्व.शंकुतलादेवी साळुंखे पाटील यांच्या पादुकाची पालखी शारदाई वात्सल्यधाम, आलेगाव रोड, जवळा येथे आणण्यात आली. त्यांच्या ११ परतवंडाच्या हस्ते पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रेखाताई पाटील, वृषाली पाटील, डॉ.निकिता देशमुख, डॉ.आस्था देशमुख यांच्या हस्ते पारिजातकाचे झाड लावण्यात आले. याप्रसंगी स्व.शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
आगामी काळात स्व.आ.काकासाहेब, स्व.शंकुतलादेवी तसेच स्व.शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ जवळा येथे ५ एकर परिसरात गोर गरिबांच्या मुलामुलींची मोफत लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय, महिला बचत गटातील एक हजार महिलांना कच्चा माल तयार करण्यासाठी सभागृह तसेच तरुणांना दर्जेदार कुस्ती प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा संकुल आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्व सोयींनीयुक्त अशी अभ्यासिका सुरू करणार असून भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या नावाने आळंदी ते पंढरपूर अशी पालखी सुरू करणार असल्याचा संकल्प यावेळी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.

























