सोलापूर – मंद्रूप आणि परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस न पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली तूर, मूग, मटकी, सोयाबीन, भुईमूग, मका, उडीद यासह इतर पिके डोळ्यांदेखत वाळून चालली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने कॅनलला तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांच्याकडे कैफियत मांडली असून, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांनीही प्रशासनाकडे कॅनलला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल किंवा कारवाई होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. शेजारील कंदलगाव आणि गुंजेगाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून कॅनलला पाणी उपलब्ध आहे. मात्र, केवळ मंद्रूप परिसरालाच दुजाभाव करून पाणी सोडण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकाच भागातील इतर गावांना पाणी मिळत असताना, मंद्रूप परिसरातील पिके पाण्याविना जळून खाक होत आहेत, यावरून प्रशासनाचा पक्षपातीपणा उघड होत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मंद्रूप परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला असून कडक उन्हामुळे उभी पिके करपून चालली आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या होत्या, मात्र आता पिके जळून चालल्याने लागवड खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही कमालीची घट झाली आहे. या भागात कॅनलचे जाळे उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी सोडले जात नाही. जर कॅनलला तात्काळ पाणी सोडले नाही, तर उरलेली पिकेही पूर्णपणे नष्ट होतील. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन मंद्रूप परिसरासाठी कॅनलचे पाणी तात्काळ सोडावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने आपली दुजाभावाची भूमिका न बदलल्यास आगामी काळात शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंद्रूप परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
….
चौकट
…
वारंवार मंद्रूपच्या शेतकऱ्यांवर अन्याय
..
शासनाच्या टेल टू हेड याप्रमाणे कॅनलचे पाणी सोडण्यात येते. मात्र नेहमी मंद्रूपचा परिसर टेल असून पाहण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक शेतकरी पाण्याच्या भरोशावर पिकांची पेरणी व लागवड करतात. मात्र ऐन वाढीच्या काळात पाण्याने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार मंद्रूप परिसर सोडून इतर ठिकाणी कॅनॉलचे पाणी येत असताना येथील शेतकऱ्यांवरच अन्याय का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे
…
पाणी न सोडल्यास कार्यालयाला कुलूप ठोकणार
….
सध्या पावसाळा असूनही उन्हाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. अशावेळी लाभधारक शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवून पाटबंधारे विभाग सापत्न वागणूक देत आहे. कंदलगाव व गुंजेगाव परिसरात महिनाभर पाणी असतानाही मंद्रूपच्या शेतकऱ्यांना आठ दिवसही पाणी मिळत नाही. हा दुजाभव आगामी काळात दूर न केल्यास व आठ दिवसात कॅनलला पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे यांनी दिला आहे.
….
मंद्रूप परिसरातील पेरणी केलेल्या पिकांना उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या पाण्याची तीव्र आवश्यकता आहे. बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याचे मागणी केली आहे. मात्र पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आठ दिवसात पाणी न सोडल्यास आमदार सुभाष देशमुख यांच्यामार्फत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंद्रूप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते यांनी सांगितले .

















