पंढरपूर – येथील विठ्ठल मंदिराच्या शिखरावर वाढलेल्या झुडपांमुळे विठ्ठल मंदिराच्या शिखराला धोका पोहचु शकतो आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून ती झुडपे काढावित. वास्तविक विठ्ठल मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी कोट्यावधींचा निधी शासनाने देवू केला आहे. गेल्या दोन, तीन वर्षापासून हे काम सुरु आहे. मात्र विठ्ठल मंदिराच्या शिखराकडे मंदिर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारकरी भाविकांमधून केला जात आहे.
अध्यात्मिक राजधानी अशी जी पंढरपूर तिर्थक्षेत्राची ओळख आहे ती येथील विठ्ठल आणि रखुमाईमुळेच. विठ्ठलरुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे चार यात्रांसह ऐरव्ही देखील भक्तांची मांदियाळी असते. आषाढी, कार्तिकी यात्रांच्या काळात लाखोंभाविकांची येथे गर्दी असते. भाविकांच्या या अथांग महासागरात अवघी पंढरीनगरी दुमदुमून गेल्याचे चित्र यावेळी येथे दिसून येते.
दरम्यान गर्दीच्या वेळी प्रत्येक भाविकाला विठुरायाचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घडेल याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे अनेक भाविक विठ्ठल रखुमाई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात. अनेक भाविक गर्दीमुळे कळसाचे दर्शन घेऊन वारी पोहचल्याचे मानतात. त्यामुळे येथील विठ्ठल मंदिराच्या कळसाला खूपच महत्व आहे. येथील मंदिर जरे प्राचिन असले तरी मंदिराच्या कळसाची निर्मिती ही प्राचिन नसून ती नवीनच आहे.
सध्या या मंदिरावर अनेक छोटी छोटी झुडपे वाढलेली दिसत आहे. वास्तविक मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम मागील दोन,तीन वर्षापासून सुरु आहे. मात्र मंदिर प्रशासनाचे शिखरांवरील झुडपांकडे अजून देखील लक्ष गेलेले दिसत नाही. ही झुडपे मोठी होवू लागलेली आहेत. त्यामुळे या झुडपांची मुळे शिखरात खोलवर गेल्यास शिखरांना इजा पोहचू शकते. त्यामुळे मंदिर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या शिखरांवरील लहान, लहान झुडपे काढून टाकावित.
या बरोबरच शिखरांवर तसेच मंदिराच्या तटभिंतीवर अशी झुडपे वाढू नयेत यासाठी कायम स्वरुपी काय करता येईल याचा देखील अभ्यास करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी देखील मागणी वारकरी भाविक तसेच महाराज मंडळींकडून केली जात आहे.
—————–
चौकट : ( मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना फोटो पाठविले : साईनाथ बडवे )
विठ्ठल व रखुमाईच्या मंदिरावरील कळसावर लहान, झुडपे वाढू लागलेली आहेत.मंदिर प्रशासनाचे सर्रास याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. शासन एकीकडे मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देत आहे. मात्र मंदिर प्रशासनाला याचे काही देणेघेणे दिसत नाही. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना कळसावर वाढलेल्या झाडांचे फोटो देखील पाठविण्यात आलेले आहेत. मंदिराला तसेच शिखराला नुकसान पोहचण्या अगोदर योग्य कारवाई केली जावी. अन्यथा शिवसेना (शिंदे गट) स्टाईलने आंदोलन केले जाईल.
साईनाथ बडवे ( युवासेना (शिवसेना शिंदे गट ) पदाधिकारी पंढरपूर )
















