वैराग – येथील प्रस्तावित ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या जमिनीचा करारनामा अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रश्न चांगलाच पेटला आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या या टाळाटाळीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अमरराजे
निंबाळकर यांनी ११ मार्च २०२६ पासून वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
वैराग व परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी वैराग शहरातील गट क्रमांक ४२२/२ मधील एकूण ४ हेक्टर ४५ आर जमिनीपैकी २ हेक्टर ४५ आर जमीन महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे.
या जमिनीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी उपजिल्हाधिकारी पत्राद्वारे बार्शीच्या तहसीलदारांना करारनामा करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट आदेश असतानाही बार्शी तहसीलदारांकडून या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचा आरोप अमरराजे निंबाळकर यांनी केला आहे.
आरोग्य सेवा रामभरोसे
सध्या वैराग परिसरातील रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी, प्रसूती सेवेसाठी किंवा प्राथमिक उपचारांसाठी बार्शी किंवा सोलापूरकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास:
* स्थानिक पातळीवर ३० खाटांची सुविधा उपलब्ध होईल.
* तात्काळ आपत्कालीन सेवा मिळणे सोपे होईल.
* गरीब व गरजू रुग्णांचा प्रवासाचा खर्च व वेळ वाचेल.
परंतु, केवळ जमिनीचा करारनामा न झाल्याने संपूर्ण प्रकल्पाची पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे.
प्रशासनाला शेवटचा इशारा
“तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासारख्या गंभीर विषयात प्रशासनाची टाळाटाळ असिह्य आहे,” अशा शब्दांत निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, जर हा करारनामा १० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण झाला नाही, तर ११ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते आमरण उपोषणाला सुरुवात करतील.
आता या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन तातडीने हालचाली करणार का, याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

























