पंढरपूर – भारताचे संविधान निर्माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रखुमाई सभागृह पोलीस संकुल, पंढरपूर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. जयंती निम्मित शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, टी.वाय.मुजावर, रेखा घनवट, सहा. पोलीस निरिक्षक योगेश लंगुटे, नगर अभियंता श्री केसकर, महावितरणचे अधिकारी तसेच शहरातील व तालुक्यातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते.
या बैठकीत डॉ.आंबेडकर जयंती डिजेमुक्त, शांततामय आणि उत्साही वातावरणात साजरी करावी. जयंती अनुषंगाने लावण्यात येणारे पोस्टर, बॅनर , झेंडे हे परवानगी घेऊन व योग्य ती खबरदारी घेऊन लावावे तसेच ते आक्षेपार्ह असु नयेत याची दक्षता घ्यावी, मिरवणूक काढण्यापूर्वी किमान तीन दिवस अगोदर परवाना घेणे बंधनकारक आहे. मंडळानी पारंपरिक वाद्याचा वापर करावा तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत अशा मंडळांना पोलीस प्रशासनातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहे. आगामी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीचा मार्ग, सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलिसांना सहकार्य करण्याबाबत उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच जयंती मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

























