मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा कामाची विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी शिष्टमंडळासह दिल्ली दौऱ्यादरम्यान गाझियाबाद येथील शिल्पकार राम सुतार यांच्या स्टुडिओमध्ये भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले.
२०१८ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले असून, वाढीव खर्चामुळे निर्माण झालेली तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यापैकी सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले असून, बूट व पॅंटचा काही भाग तयार झाला आहे. उर्वरित काम गाझियाबाद येथे सुरू आहे. प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट असले तरी, विलंब होऊन २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दादर येथील चैत्यभूमीजवळील ४.८४ हेक्टर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या स्मारकात ४५० फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ हा मुख्य आकर्षण राहणार आहे. यामध्ये ग्रंथालय, प्रदर्शन केंद्र, ध्यान हॉल, ३६० अंश दृश्य गॅलरी आणि उद्यानाचा समावेश आहे. अंदाजे १ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प भविष्यात देश-विदेशातील अनुयायांसाठी प्रमुख पर्यटन व प्रेरणास्थळ ठरेल, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.
या पाहणीवेळी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रा. सुनील मगरे, बाळासाहेब कर्डक, संजय औसरमल, अतुल जगताप, दशरथ कसबे, बाळासाहेब गायकवाड, बबन शिंदे, मिलिंद रामटेके, डॉ. विजय आंबुरे, नागसेन कांबळे, अरुण साबळे, नितीन जाधव, संतोष नरवडे, उमेश सोनवणे, संजय खंदारे, सुरेश बनसोडे, बाळासाहेब सोनकांबळे, गौतम धावणे, शंकरराव घेवंदे, सुधाकर बागुल, सुरेश काळे, रुपेश कुमार गवई, विनोद पट्टेबहादूर, संदीप बेलखेडे, प्रशांत झांबरे, तानाजी वडवे, महेंद्र शिरसाट, गणेश पुजारी, राजेंद्र जाधव, प्रसाद पाटणकर, रमाकांत धावणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
















