सोलापूर : महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचा सन- २०२६- २७ या आर्थिक वर्षाचा ६४ कोटी ५० लाखाच्या अंदाजपत्रकाला महापालिका सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.
सोलापूर महापालिकेच्या सभागृहात परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रकावर विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर विनायक कोंड्याल हे होते. अद्यापही महापालिका परिवहन समिती स्थापन न झाल्याने परिवहन उपक्रम प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत मान्यता देऊन पुढील शिफारसी साठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले होते. यानुसार सर्वसाधारण सभेत हा अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी मांडला. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी या संदर्भातील सूचना केली. विरोधी पक्षाकडून यावर कोणतीही उपसूचना न आल्याने झटक्यातच महापालिकेचा अंदाजपत्रकाला एकमताने महापौरांनी मान्यता दिली.
सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये एकूण १० ते १२ बसेस धावलेले असून आता बसेसची संख्या ही ३५ इतकी दाखविण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात सन- २०२६-२७ मध्ये केंद्र शासनाकडून येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ३० बसेससह ४० पेक्षा अधिक बसेस धावणार असल्याचे दाखवत त्यामधून उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांची सोय होणार असल्याचे नव्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गतवर्षी परिवहनचे अंदाजपत्रक हे ५९ कोटी ३१ लाखाचे होते. यामध्ये यंदा ५ कोटी १९ लाख रुपये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेकडून परिवहन विभागाला अनुदान स्वरूपात १४ कोटी रुपये मिळालेले आहे. शिवाय आता चालू आर्थिक वर्षात देखील महापालिकेकडून १७ कोटी ३२ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासह विविध जमा खर्च दाखविण्यात आले असून या अंदाजपत्रकाला सभागृहात मान्यता देण्यात आली.
अशी असणार परिवहन उपक्रम जमा बाजू
– विभागाचे नाव- अंदाजी तरतूद रक्कम
– आरंभी शिल्लक- १ लाख
– वाहतूक विभाग- ६ कोटी ४७ लाख २५ हजार ८०७
– कर्मशाळा विभाग- ८१ लाख ४१ हजार ८५८
– महापालिकेकडून आर्थिक सहाय- १७ कोटी ३२ लाख ८० हजार
– पीएमईव्ही बसेस मधून मिळणारे उत्पन्न- १४ कोटी ७१ लाख १२ हजार १३४
– महापालिका शासन अनुदान- २३ कोटी ७४ लाख ९३ हजार ६२८
– ॲडव्हान्स / डिपॉझिट- १ कोटी ४० लाख ८१ हजार ५००
– बँक व्याज जमा- १ लाख २६ हजार ४९६
– एकूण- ६४ कोटी ५० लाख ६१ हजार ४२३
परिवहन उपक्रम असे होणार खर्च
– विभागाचे नाव- अंदाजित खर्च रक्कम
– डिझेल विभाग- ४ कोटी
– कर्मशाळा विभाग- १ कोटी ३९ लाख
– वाहतूक विभाग- १४ कोटी ०२ लाख ३५ हजार
– ड्युटी क्लार्क (मनपा अनुदानानुसार पाच कोटी)- ५ कोटी ६४ लाख ०१ हजार ५५१
– पेन्शन विभाग- ८ कोटी ०५ लाख ३५ हजार २००
– प्रा. फंड विभाग / व्यवसाय कर / ईएसआय- २ कोटी ५२ लाख ६१ हजार
– स्टेशनरी विभाग- १३ लाख ५० हजार
– परिवहन समिती सभापती खर्च- १७ लाख
– लेखा विभाग- ५८ लाख ०१ हजार ३००
– कोर्ट / विधी विभाग- ५४ लाख
– थकीत देणी- २६ कोटी १६ लाख ६० हजार १२६
– सण ऍडव्हान्स मनपाकडे वर्ग- ८ लाख
– अॅड. / डिपॉझिट- १ कोटी १९ लाख १७ हजार ०१०
– बँक चार्जेस- २३६ रुपये
– शिल्लक- १ लाख
– एकूण- ६४ कोटी ५० लाख ६१ लाख ४२३

















