सांगोला – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत माण नदीमध्ये उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले असून त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संदर्भात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील क्र.४ आणि ५ फाट्यामधूनही लवकरच उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. माण नदीत आवर्तन सोडल्याने नदीकाठच्या गावांतील विहिरी, बोअरवेल्स आणि इतर पाणीस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी खरीपपूर्व शेतीकामांना गती मिळेल तसेच जनावरांच्या पाण्याची टंचाई कमी होईल. काही भागांत आधीच पाणीटंचाई तीव्र झाल्याने या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाण्याची बचत करणाऱ्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील सिंचनक्षेत्रात वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, अशा उन्हाळी आवर्तनांमुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. आगामी काळात पाण्याच्या साठ्याची स्थिती लक्षात घेऊन आणखी आवर्तनांचे नियोजन करण्याबाबतही सकारात्मक संकेत बैठकीत देण्यात आले. या बैठकीत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सांगोला तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

























