सोलापूर : माध्व संप्रदायाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्तरादी मठ आणि श्री बालाजी मंदिर सोलापुरात विजयपूर रस्त्यावर बांधण्यात येत आहे. या मठाच्या दुसऱ्या मजल्याच्या छत बांधकामास (काँक्रीट स्लॅब भरणी) मंगळवारी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी पं. राघवेंद्र आचार्य आद्य, राम तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयपूर रस्त्यावरील पाटील नगर येथे श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली १६ हजार ७०० चौ. फूट जागेत मे २०२४ पासून भव्य मठाचे आणि श्री बालाजी मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मार्च २०२७ मध्ये हे बांधकाम पूर्ण होणार आहे. या मठाच्या तळमजल्यावर श्री बालाजी मंदिर निर्माण करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर भक्त निवासासाठी १० खोल्या आणि एक मोठे सभागृह तर दुसऱ्या मजल्यावर ७ हजार ५०० चौ. फुटांचे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. याशिवाय मठामध्ये गोशाळा, वेद पाठशाळा तयार करण्यात येणार आहे.
दुसऱ्या मजल्याच्या छत बांधकाम प्रारंभाप्रसंगी (काँक्रीट स्लॅब भरणी) पंडित अमित आचार्य पुजार यांनी पौरोहित्य केले. यावेळी पं. गोविंद गवई, परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आनंद खंडेलवाल, विश्व मध्व महापरिषदेचे सोलापूर शहराचे अध्यक्ष बी. जी. कुलकर्णी, निशिकांत खेडकर, डॉ. एस. डी. गोटे तसेच विश्व मध्व महापरिषदेचे संचालक, भाविक उपस्थित होते.

























