बार्शी – श्री भगवंत प्रकटदिनानिमित्त बार्शी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून श्री भगवंताची विधीवत महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, भगवंत देवस्थानचे सरपंच दादासाहेब बुडूख, सभापती मीनाक्षी रोंगे, कृउबा समितीचे चेअरमन विजय गरड, वर्षाताई ठोंबरे, कविता राऊत, हभप जयवंत बोधले महाराज, विजय राऊत, ॲड. रणवीर राऊत, महावीर कदम, रमेश पाटील,आसिफ तांबोळी,अरुण बारबोले, उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची भूमी ही अत्यंत पवित्र असून येथे भगवान विष्णूंनी भक्तांसाठी विविध अवतार धारण केले आहेत. बार्शी येथे राजा अंबरीषासाठी भगवान विष्णूंनी ‘भगवंत’ रुपात अवतार घेतला, तर पंढरपूर येथे भक्त पुंडलिकासाठी ‘विठ्ठल’ रुपात अवतार घेतला. ही भूमी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांची समृद्ध परंपरा जपणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
बार्शीच्या श्री भगवंत मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व
मुख्यमंत्री म्हणाले की, बार्शीतील श्री भगवंत मंदिर हे अत्यंत प्राचीन असून त्याचा उल्लेख दहाव्या/अकराव्या शतकातही आढळतो. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम असलेले हे मंदिर जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
त्यांनी पुढे सांगितले की, शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा, लोकपरंपरा आणि संस्कार यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्मिक ठेव्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. बार्शीचा उल्लेख पुराणांमध्ये वारंवार आढळतो, तसेच विष्णुपुराणातही या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. दुर्वासा ऋषींचे गर्वहरणही याच भूमीत झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
ईश्वर चरणी नतमस्तक आणि मानसिक बळ
मुख्यमंत्री म्हणाले की, ईश्वराकडे काही मागण्याची गरज नसते. ईश्वराच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनाला शांती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. ईश्वरीय शक्ती आपल्याला मानसिक बळ देते आणि त्या बळाच्या जोरावर आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, श्री भगवंत प्रकटदिनी महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा आग्रह माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सातत्याने केला होता. त्या आग्रहाचा मान राखून आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बार्शी तीर्थक्षेत्र विकासाला शासनाचे पूर्ण समर्थन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बार्शीच्या तीर्थक्षेत्र विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनासमोर सादर केलेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या आराखड्यात नमूद केलेल्या सर्व बाबी टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. बार्शीच्या श्री भगवंत मंदिराचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास करुन या ठिकाणाला एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
राजाभाऊ राऊत यांना उज्ज्वल राजकीय भविष्य
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील निकाल हा जनतेचा आशीर्वाद असून, त्यांनी पूर्वी झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
राजाभाऊ राऊत हे जनतेसाठी सातत्याने काम करणारे, संघर्षशील आणि लोकाभिमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांना पुढे मोठ्या संधी मिळतील आणि त्यांचे राजकीय भविष्य भरपूर व उज्ज्वल आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अशा कार्यक्षम नेत्यांची निश्चितच कदर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घरकुल चावीचे अनावरण
बार्शी शहरातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, धाराशीव जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., नगराध्यक्षा तेजस्वीनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील आदी उपस्थित होते.
























