सोलापूर – श्रीकृष्ण रायरा मठातर्फे आयोजित करण्यात आलेला सोलापुरातील पहिलाच श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव अपूर्व उत्साहात आणि भक्तीयुक्त वातावरणात संपन्न झाला.
भगवान वेंकटेशाचा हा विवाह सोहळा पाहण्यास सोलापूरचे हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेली व्यासपीठाची सजावट आणि अतिशय कलात्मकतेने सजवलेली व्यंकटेशाची प्रतिमा मनमोहक होती. ही सारी आरास पाहून भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
पहाटे पाच वाजल्यापासून श्री श्री मुष्णम राघवेंद्र आचार्य आणि त्यांच्या सहकार्यांनी विवाहाचे सर्व विधी यथास्थितपणे पार पाडले. दुपारी अकरा वाजता कल्याण महोत्सव आणि बारा वाजता अक्षता, मंगलसूत्र परिधान, कन्यादान आणि महापूजा असा समारंभ झाला तेव्हा सोलापूर शहरातील अनेक मान्यवर आणि भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
सोलापुरात प्रथमच असा अपूर्व सोहळा अनुभवण्यास मिळाला अशी प्रतिक्रिया भक्त भाविकांनी व्यक्त केली. महाप्रसादानंतर या कार्यक्रमाचा पूर्वार्ध पार पडला.
दुपारच्या सत्रात अर्चना तुलसी, भजन, माला धारण इत्यादी कार्यक्रम पार पडले. श्री नंदकिशोर रामकिसन धूत (एन आर धूत ग्रुप) आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यासोबतच लक्ष्मण करली तसेच करली परिवार यांनी या कल्याण महोत्सवाच्या यजमानपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
खा.ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, विरोधी पक्ष नेते चैतन नरोटे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सामाजिक कार्यकर्ते कुमार करजगी, ब्रिजमोहन फोफलिया, डॉ. सूर्यप्रकाश कोठे,, पुरुषोत्तम उडता, डॉ. राजेंद्र गाजूल, डॉ. बस्वराज कोलूर, गौतमचंद संचेती, श्रीनिवास चिलका, व्यंकटेश चिलका आदींनी भेट देऊन दर्शन घेतले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, कार्याध्यक्ष हरिदास बुरा, खजिनदार लक्ष्मण करली, कार्याध्यक्ष मंदार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी आणि अँकर अर्चना बुरा यांनी सूत्रसंचालन केले.



























