सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील सलगर व सदलापूर येथील शेतामध्ये रानडुकराने हैदोत घातला असून दोन दिवसातील हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे रानात काम करताना शेतकरी व शेतमजुरांमध्ये या रानडुकरांप्रती भीती निर्माण झाली असून या रानडुकरांचा वन खात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी जखमी शेतकऱ्यांनी केली आहे .
देवानंद संगणक बसप्पा पाटील ( वय 19 वर्ष , राहणार सलगर , ता . अक्कलकोट ) हे 18 मे रोजी पहाटे चार वाजता शेतात पिकांना पाणी देत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करून पाठीला चावा घेतला. जखम झाल्याने ते उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी स्वतः दाखल झाले.
राजकुमार रामलिंग गुडेवाडी (वय 55 वर्ष , रा . सदलापूर ,तालुका अक्कलकोट ) हे 18 मे रोजी सकाळी 11 वाजता स्वतःच्या शेतातून प्रातविधीला निघाले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला . राजकुमार यांनी प्रतिकार केल्याने डुकराने त्यांच्या दोन्ही हाताच्या बोटांना चावा घेतला . यात एका बोटाचा तुकडाच पडला . जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात शेजारी सतीश यांनी दुपारी दाखल केले .
मल्लेश लक्ष्मण गवळी ( वय 30 वर्षे , रा. सदलापूर , ता . अक्कलकोट ) हा शेतकरी 18 मे रोजी सकाळी शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यावर हल्ला केला . चावा घेतल्याने हाताच्या बोटांना जखम झाल्याने त्याला येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी दुपारी भाऊ यल्लप्पा यांनी दाखल केले .