सोलापूर – नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी पंचायत समिती दक्षिण सोलापूरने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी “प्रतीकात्मक सरपंच” म्हणून काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी याबाबत ग्रामपंचायतींना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणिवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी माहिती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 4 जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रतीकात्मक सरपंच म्हणून संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीमार्फत सत्कार करण्यात येणार असून, सरपंच पदाची खुर्चीही त्यांना प्रतीकात्मक स्वरूपात देण्यात येईल.
या दिवशी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी आदी ठिकाणांना भेट देऊन स्थानिक प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून दिली जाणार आहे.
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांची प्रत भेट स्वरूपात देण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत. पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
Post Views: 12