हुलजंती येथून चोरट्याने 4 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर नेला चोरुन
मंगळवेढा – हुलजंती येथे शेतातील घराजवळ 4 लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी शरणाप्पा शिवाप्पा कुंभारी (रा.हुलजंती) यांचा पांढर्या रंगाचा स्वराज कंपनीचा 724 मॉडेलचा ट्रॅक्टर नंबर एम.एच.13 ई.एक्स. 3466 चार लाख रुपये किंमतीचा शेतातील घराजवळ दि.27 मे रोजी संध्याकाळी उभा केला होता. दुसर्या दिवशी सकाळी फिर्यादीने उठून पाहिले असता सदरच्या ठिकाणी ट्रॅक्टर दिसून आला नाही. दरम्यान फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीने त्याच्या आर्थिक फायद्याकरिता ट्रॅक्टर चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रमोद मोरे हे करीत आहेत.
————–
माचणूर हद्दीत उभा केलेल्या ट्रकचे 14 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी चोरले
मंगळवेढा : माचणूर हद्दीते सिमेंट घेवून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रक मधील 150 लिटर 14 हजार 934 रुपये किंमतीचे डिझेल चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून अज्ञात चोरटयाविरुध्द मंगळवेढा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची हकीकत अशी,यातील ट्रक चालक नितीन रंदवे (रा.ब्रम्हपुरी) हा सोलापूरहून सिमेंट घेवून 30 मे रोजी पहाटे 2 वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान माचणूर हद्दीत ट्रक उभा केल्यानंतर चालकाने आपली दोन मुले ट्रकच्या कॅबीनवर संरक्षणासाठी झोपविली होती. या दरम्यान अज्ञात चारचाकी गाडी घेवून आलेल्या चोरटयांनी ट्रकच्या डिझेल टाकीमधील 150 लिटर 14 हजार 934 रुपये किंमतीचे टाकीचे लॉक तोडून घेवून पोबारा केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सध्या डिझेल,पेट्रोल,गॅस यांची युध्दामुळे टंचाई भासत असून याचे दरही कडाडत असताना चोरट्यांनी आता डिझेलवर ही डोळा ठेवून चोरी करण्याच्या घटना सुरु केल्या असल्याचे या घटनेवरुन उघड होत आहे. पंढरपूर तालुक्यात मोहोळ मधील आलेल्या चोरट्यांनी वाहनातील पाईपच्या सहाय्याने डिझेल काढताना नागरिकांनी पकडण्याचा प्रकार उघड झाला आहे. मंगळवेढा पोलीस त्या अनुषंगानेही पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
————–
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलींचा तपास लावण्यात महिला फौजदार यांना यश
मंगळवेढा – शहर व ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांना यश मिळाले असून सदर मुलींना त्यांच्या आई वडिलाच्या ताब्यात देण्यात आले असून अन्य दोन व्यक्ती विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाच्या विविध भागातून सहा अल्पवयीन मुली काही महिन्यापुर्वी उचेठाण, चोखामेळानगर, नागणेवाडी, साठेनगर, नंदूर या ठिकाणाहून बेपत्ता झाल्या होत्या. सदरचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी केला असून सदर मुलींचे मोबाईल लोकेशन व सीडीआर काढून सहा मुली विविध ठिकाणाहून मिळविण्यात तपासिक अंमलदार आरती कणिरे यांना यश प्राप्त झाले आहे. दरम्यान यामध्ये पांडुरंग सुनिल माने व चांद शेख यांच्या विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासिक अंमलदार यांनी सांगीतले. दरम्यान डॉ.आरती कणिरे यांनी मंगळवेढ्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून आत्तापर्यंत 31 बेपत्ता मुली शोधून त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.