अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दी करिता केलेल्या उपाय योजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, या मध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद सेवा या सर्व सुखकर सोयी करण्यात आल्या आहेत. दि. १ मे ते ३१ मे दरम्यान अन्नछत्र मंडळात सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रातील मिळून सरासरी महिन्याभरात ३१ लाखाहून अधिक भक्तांनी महाप्रसाद घेतला आहे. प्रचंड गर्दीत अन्नछत्र मंडळ गर्दी व्यवस्थापन करण्यामध्ये अव्वल ठरले आहे. तीर्थटनातून पर्यटन यामुळे न्यासाचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.*
१ मे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, अंगारक चतुर्थी, वैशाख अपरा एकादशी, जेष्ठ शुध्द कमला एकादशी, अमावस्या, अधिक मास, गुरुपुष्यामृत, अधिक मास पोर्णिमा, उन्हाळी सलग सुट्यामुळे दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी होत आहे. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे अन्नछत्र व मंदिर परिसर गजबजुन गेले. दुपारी उन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी व अन्नछत्र मंडळात गर्दी करत आहेत.
अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भावीक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या सेवेंर्थ विविध उपाययोजना करण्यात आल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.